जमीर काझी
मुंबई - पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बॅँकेच्या (पीएमसी) हजारो खातेदारांना अडचणीत आणण्यात कारणीभूत ठरलेल्या हाऊसिंग डेव्हल्पमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने (एचडीआयएल) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्यावर कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या आठवड्याभरात या कंपनीची तब्बल ५ हजार कोटीवर किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. कंपनीच्या देशभरातील मालमत्ता येत्या काही दिवसात सील केली जाणार असून कंपनीचे देश-विदेशातील व्यवहाराची पडताळणी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दिवाळखोरीत आलेल्या एचडीआयएल कंपनीचा कार्यकारी संचालक राकेश वाधवा व त्याचा मुलगा सारंग उर्फ सन्नी वाधवा यांना ३ ऑक्टोबरला अटक केली आहे. त्यांच्या कोठडीची मुदत १४ ऑक्टोबरपर्यंत आहे. वाधवा यांच्या मालकीच्या वसईतील दिवाण फार्महाऊस शुक्रवारी जप्त केला आहे. सुमारे पाच एकर परिसराच्या या विर्स्तीण बंगल्यात तलावाहस २२ मोठ्या खोल्या आहेत. त्याशिवाय विरार, पालघर येथील बंगले व ४०० एकर भूखंड ताब्यात घेतले आहेत. त्याशिवाय वाधवा कुंटुंबियाच्या मालकीचे दोन खासगी विमाने, जहाज तसेच रॉयल्स ,मर्सिडिझ बेझ, बेटली, टोयाटा इनोव्हेशन अशा सुमारे ११२ अलिशान मोटारी जप्त केल्या आहेत. वाधवा यांच्या बंगल्यातून लाखोची रोकड व महागडी दागिने त्याची किंमतही शेकडो कोटीच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पीएमसी बॅँकेकडून ‘एचडीआयएल’ने साडेतीन हजार कोटीचे कर्ज घेतले असून त्याची परतफेड केली नाही. बॅँकेचे तत्कालीन अध्यक्ष वरम सिंग व अन्य संचालक आणि बॅँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमतातून ही कर्जे मंजुर करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे. बॅँकेने २१ हजार बनावट खाती बनवून त्यातून हजारो कोटीची बेनामी कर्जे उचलली आहेत. बॅँकेच्या घोटाळ्यात प्रामुख्याने एचडीआयएलच्या मोठा वाटा आहे. वाधवा यांनी घेतलेली रक्कम अन्य व्यवहार व परदेशात गुंतविल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने दहा दिवसापूर्वी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मुंबई ईडीने ‘मनी लॉण्ड्रींग’अंतर्गत गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.
एचडीआयएलच्या परदेशातील व्यवहाराची छाननी करण्यात येत आहे. वाधवा कुंटबिय व कंपनीचे सर्व व्यवहार सील केले आहेत. वाधवाची मुंबई व्यतिरिक्त देशातील अन्य ठिकाणच्या मालमत्तावर बडगा उगारला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.