ईडीची धडक कारवाई; अजित पवारांच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यावर जप्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:14 PM2021-07-01T20:14:12+5:302021-07-01T20:34:24+5:30
अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत होते. त्यामुळे आता अजित पवारांचीही ईडी चौकशी होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी सहकारी कारखाना होता. मात्र, महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. नंतर तो कारखाना खाजगीरित्या विकत घेतला गेला आला. अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत होते. त्यामुळे आता अजित पवारांचीही ईडी चौकशी होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यांच्या मालकांनी महाराष्ट्र राज्य सहकार बँकेकडून कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं. नंतर त्या साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला. या साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. त्याअनुषंगाने ईडीने केलेली ही मोठी कारवाई आहे.अजित पवारांच्या निकटवर्तीयांपर्यंत ईडी पोहचली असल्याने पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अजित पवार आणि ६५ जणांना क्लीन चिट दिली होती. मुंबईच्या सत्र न्यायालयात मागील वर्षी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. मात्र या निकालाला माजी मंत्र्यांसह पाच जणांनी आव्हान दिलं होतं. सुरेंद्र मोहन अरोरा, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिकराव जाधव यांच्यासह आणखी दोघांनी प्रोटेस्ट याचिका दाखल केली होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजलेलं असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
अजित पवार झाले होते नॉट रिचेबल
त्यानंतर ऑक्टोबर २०१९मध्ये अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पवारांचा राजीनामा मंजूर देखील केला होता. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात झाली असतानाच पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. ते दोन दिवस 'नॉट रिचेबल'ही होते. मात्र नंतर, शरद पवारांवर नाहक आरोप झाल्यानं व्यथित होऊन आपण राजीनामा दिला होता, असं सांगत त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली होती.