मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या नातेवाईकांवर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची मुलगी (priti shinde) आणि जावयाची सुमारे 35.48 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. (ED attaches assets of Sushil Kumar Shinde's daughter, son-in-law in money laundering case.)
सुशिलकुमार शिंदेची मुलगी प्रीती आणि जावई राज श्रॉफ यांची ही मालमत्ता आहे. ही मालमत्ता अंधेरीतील कालेडोनिया इमारतीमधील आहे.
पीएमएलए कायद्यानुसार जप्त केलेल्या या मालमत्ता या अंधेरीतील असून 10,550 चौरस फूटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता आहेत. प्रीती श्रॉफ या काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांची कन्या आणि प्रणिती शिंदे यांची बहीण आहेत.
डीएचएफएल (DHFL) अनेक घोटाळ्यांमध्ये सामील पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडला दिलेलं 3,688.58 कोटी कर्ज हे घोटाळा घोषित केले आहे. यस बँकेतील घोटाळ्याबाबतही या कंपनीची चौकशी सुरु आहे. कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधू अटकेत आहेत आणि त्यांची मालमत्ता देखील ईडीने जप्त केली आहे. यस बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने माजी बँक प्रमुख राणा कपूर आणि डीएचएफएलचे प्रमोटर कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याकडे 2400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यात राणा कपूरचे 1000 कोटी आणि वाधवान बंधूंच्या 1400 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबरमध्ये दिवाळखोरी प्रक्रियेसाठी डीएचएफएलला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) सोपवले आहे. डीएचएफएल ही पहिली वित्तीय कंपनी आहे, ज्या कंपनीला आरबीआयने एनसीएलटीला कलम 227 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करून सोपविले. तत्पूर्वी कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे आणि प्रशासक म्हणून आर सुब्रमण्यम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.