नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याची तब्बल ५४ कोटी रुपयांची मालमत्ता अंबलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. महत्वाचे म्हणजे कार्तीच्या परदेशातील इंग्लंड,स्पेन आणि ऊटीतील बंगल्यांनाही टाळे ठोकण्यात आले आहे. स्पेनच्या बार्सीलोनातील टेनिस क्लब, इंग्लंडमधील एक कॉटेज हाऊस, चेन्नईच्या बँकेतील ९० लाखांचे फिक्स्ड डिपॉझिट, उटीतील कोडाइकेनलचे बंगले, दिल्लीच्या जोरबाघ परिसरातील आलिशान फ्लॅट आदी मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे.
कार्तीची कंपनी आयएनक्स मीडिया हाऊसला बेकायदेशीरपणे पैसा मिळत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास केला असता अनेक बेकायदेशीर व्यवहारांची माहिती उघड झाली. याप्रकरणी सीबीआयने कार्तीविरूद्ध एफआयआर देखील दाखल केला आहे.या एफआयआरच्याआधारे ईडीची कारवाई सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (एसीबी) करण्यात आली आहे. जप्त केलेली ५४ कोटींची मालमत्ता कार्ती आणि एएससीपीएल (Advantage Strategic Consulting Private Limited) कंपनीच्या नावावर आहे.