लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अज्ञातवासात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात अखेर स्वतःहून हजर झाले. देशमुख यांच्या चौकशीसाठी ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार हे दिल्ली येथून खास विमानाने रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्याने या प्रकरणातील घडामोडींना वेग आला आहे. आपण निर्दोष असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.
दरमहा १०० कोटींच्या कथित हप्ता गोळा करण्याच्या प्रकरणी दाखल मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात त्यांची दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ईडीच्या मुंबई विभागाचा अतिरिक्त कार्यभार सत्यव्रत कुमार यांच्याकडे आहे. राजकीयदृष्ट्या हे े प्रकरण संवेदनशील असल्याने देशमुख यांची चौकशी महत्त्वाची आहे. त्यामुळे याबाबत योग्यप्रकारे तपास करणे आवश्यक असल्याने सत्यव्रत कुमार यांना मुंबईत जाण्याची सूचना वरिष्ठांकडून करण्यात आली.
दरम्यान, आपण पळून गेलेलो नव्हतो, न्यायालयाच्या आदेशानुसार ईडी चौकशीला सहकार्य करू असे अनिल देशमुख यांनी ईडीसमोर हजर होण्यापूर्वी व्हिडिओद्वारे जाहीर केले. सीबीआय व ईडीकडून देशमुख यांची चौकशी केली जात आहे. ईडीने त्यांना पाच वेळा समन्स बजावले होते. मात्र, देशमुख वकिलामार्फत समन्स नोटिसीला उत्तर देत होते. त्यामुळे सीबीआय, ईडीकडून त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
सचिवही कोठडीतदेशमुख वकील इंद्रपाल सिंह यांच्यासह सोमवारी सकाळी ११.५० वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना ४ महिन्यांपूर्वी ईडीने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.