लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : शहरातील सरकारी मुलींच्या बालसुधारगृहातून मंगळवारी पहाटे तीन वाजता आठ मुली पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान पळून गेलेल्या आठ पैकी सात मुलींचा शोध घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे सरकारी मुलींचे बालसुधारगृह आहे. मंगळवारी पहाटे एकूण आठ मुलींनी संगनमत करून खिडकीचे लोखंडी गज वाकवून पळ काढला. मुली पळून गेल्याची माहिती रात्री बालसुधारगृहाच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी हिललाईन पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस पथकाने कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान आठपैकी सात मुलींचा शोध लागला. मात्र, एक मुलगी पळून गेली.
कारभारावर प्रश्नचिन्ह
- बालसुधारगृहाच्या अधीक्षिका व्हीव्हीएन सिल्व्हर यांनी पळून गेलेल्या मुली सापडल्याची माहिती दिली. सर्व मुली उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आदी ठिकाणच्या रहिवासी असून, त्यांच्या घरचा पत्ता शोधण्याचे काम पोलिस करीत आहेत.
- मुलींना घरी जायचे होते म्हणून त्या पळून गेल्याची माहिती सिल्व्हर यांनी दिली. तर जगताप यांच्या चौकशीत मुलींना सुखसुविधा व जेवण नियमित तसेच चांगले दिले जात नाही म्हणून पळून गेल्याचे म्हटले आहे.
- महिला केअरटेकर, पोलिस बंदोबस्त असतानाही मुली पळून गेल्याची घटना घडल्याने बालसुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.