अमरावती: चाकुचा धाक दाखवत एका कुरिअरमॅनकडील आठ लाख रूपये रोख रक्कम लुटण्यात आली. १८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास चुनाभट्टी भागात ही घटना घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी रात्री ११.३२ च्या सुमारास इलियाझ अली अहमद अली (२४) व साहिल खान रऊफ खान (दोघेही रा. बिस्मिल्ला नगर) व गोलू मिस्त्री उर्फ मोहम्मद परवेज मोहम्मद आरिफ (रा. ताजनगर) यांच्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. यातील इलियाज अली हा घटनास्थळीच पकडला गेला. तर दोघे फरार आहेत.
क्रिपालसिंग बलवंतजी ठाकोर (२४ ह.मु. रवीनगर्) हा एका मित्रासह दुचाकीने जात होता. त्याच्याकडे कुरिअरने पाठवायचे एका व्यापाऱ्याची आठ लाख रुपये कॅश होती. दरम्यान एका दुचाकीवरील तिघे आरोपी त्याचा पाठलाग करत चुनाभट्टी परिसरापर्यंत पोहोचले. ठाकोर व त्याच्या मित्राला थांबवून दोघांनाही मोपेडटवरून खाली पाडण्यात आले. त्याचवेळी दोन आरोपींनी ठाकोरवर चाकुसारख्या शस्त्राने वार केला. तथा धाक दाखवून त्याचेकडील आठ लाख रुपये हिसकावून दुचाकीने पळ काढला. या लोंबोझोंबीदरम्यान, आरोपी इलियाज अलीला दोन सहकारी पळून जात असताना त्यांच्या दुचाकीवर बसणे शक्य झाले नाही. तोपर्यंत तेथे बरीच गर्दी देखील झाली. काही उपस्थित नागरिकांनी इलियाज अलीला पकडून राजापेठ पोलिसांच्या स्वाधिन केले.
ते दोघे फरार -इलिजाय अलीला पोलीसी खाक्या दाखवताच घटनास्थळाहून फरार झालेल्या दोघांची नावे उघड झाली. त्यांचे मोबाईल नंबर व लोकेशन ट्रेस करण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत तरी राजापेठ पोलिसांच्या हाती आठ लाख रुपये घेऊन पळणाऱ्या साहिल खान व गोलू मिस्त्रीचा सुगावा लागलेला नाही.