संदीप मानकर
अमरावती - राज्यातील विविध विभागांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) केलेल्या आठ महिन्यांतील कारवाईत ५८० सापळे यशस्वी झाले आहेत. यात ७७८ आरोपी अडकले आहेत. अपसंपदेचे १४ आणि अन्य भ्रष्टाचाराचे चार तर एकूण ५९८ गुन्हे एसीबीने दाखल केले आहेत. राज्यात लाच खाण्यात अव्वल महसूल विभाग असून १३७ सापळ्यात १८३ आरोपी अडकले आहेत.राज्यात एसीबीच्या आठही विभागांनी ५८० सापळे १ जानेवारी ते ३० ऑगस्ट २०१९ दरम्यान टाकण्यात आले आहेत. लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये १ कोटी ३५ लाख ५४ हजार ४३५ रुपये एवढी सापळा रक्कम होती. राज्यात करण्यात आलेल्या कारवाईत वर्ग १ चे ३७, वर्ग २ चे ६४ अधिकारी, तर सर्वाधिक वर्ग ३ चे ४६३ जण अडकले आहेत. सापळ्यांमध्ये महसूल, भूमिअभिलेख १३७ सापळे, पोलीस विभाग १३१ सापळे, महावितरण २४, महापालिका ३३, नगर परिषद १२, जिल्हा परिषद २७, पंचायत समिती ५३, वनविभाग १५, जलसंपदा विभाग ११, सार्वजनिक आरोग्य विभाग १५, आरटीओ १२, शिक्षण विभाग १९ यांच्यासह इतर अनेक विभागांचा यामध्ये समावेश आहे. एसीबीकडे नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे सापळे यशस्वी होत आहेत. त्यामुळे अधिकारी - कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असले तरी लाचखोरीत घट झालेली नाही. अपसंपदेची १४ प्रकरणे दाखलगेल्या आठ महिन्यांत अपसंपदेची एसीबीने १४ प्रकरणे दाखल केली. यात २६ जण अडकले असून ११ अधिकारी आणि १२ खासगी व्यक्तींचा समावेश आहेत. अपसंपदा प्रकरणातील मालमत्ता ही ७ कोटी ७९ लाख १७ हजार ६४९ एवढी असल्याची माहिती एसीबीने दिली. पुणे विभागात सर्वाधिक १२८ सापळेराज्यात सर्वाधिक १२८ सापळे हे पुणे विभागात यशस्वी झालेत. यामध्ये १७३ आरोपी अडकले आहेत. दुसऱ्या स्थानी ८५ सापळे औरंगाबाद विभागात टाकण्यात आले आहे. मुंबई विभागात सर्वात कमी २७, ठाणे विभाग ६०, नाशिक ७९, नागपूर ६६, अमरावती ७६ आणि नांदेड विभागात ५९ सापळे यशस्वी झाले आहेत. वर्षनिहाय सापळे वर्षे सापळ्यांची संख्या २०११ ४३७२०१२ ४८९२०१३ ५८३२०१४ १२४५२०१५ १२३४२०१६ ९८५२०१७ ८७५२०१८ ८९१२०१९ ५८०