हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पार्डी मोड येथे एकाच्या घरातून ४ लाख ७० हजार रूपये किमतीच्या आठ दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्या. ही कारवाई २७ मे रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आली. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात २८ मे रोजी दुपारी गुन्हा नोंद झाला.
कळमनुरी तालुक्यातील पार्डी मोड येथील एकाच्या घरी आठ दुचाकी असून त्या चोरीच्या असण्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने शनिवारी पार्डी मोड येथील गजानन कामाजी पवार (वय २३) याचे घरी छापा टाकला. यावेळी घराच्या बाजूला आठ दुचाकी आढळून आल्या. यातील काही दुचाकीवर नंबर प्लेट आढळून आली नाही.तर काही दुचाकी नांदेड व हिंगोली जिल्हा पासिंग असलेल्या आहेत. या दुचाकीबाबत विचारणा केली असता त्यास समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी जवळपास ४ लाख ७० हजार रूपये किमतीच्या आठही दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या फिर्यादीवरून गजानन कामाजी पवार याचेविरूद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत,विशाल खंडागळे, आझम प्यारेवाले आदींच्या पथकाने केली.