मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखा दिसत असल्याने पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून आपलीच हवा करणाऱ्या व्यक्तीवर पुणे पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी या व्यक्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
विजय नंदकुमार माने याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने याने चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा आणि परिधान केलेलं व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट यामुळे ते शिंदे यांच्यासारखेच दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसत असल्याने पुण्यात हवा करत असलेल्या तरुणावर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विजय नंदकुमार माने याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आताही त्याने शिंदेंसारखाच पोशाख परिधान करून सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ सोबत फोटो सेशन केले होते. पोलिसांनी यावरून गुन्हा दाखल करताच, तो मी नव्हेच अशी भूमिका माने याने मांडली होती.
मोहोळसोबतचे फोटो व्हायरल होऊ लागल्याने मुख्यमंत्री शिंदेच आहेत, असे लोकांना वाटेल म्हणून पोलिसांनी मानेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी माने याने अॅड. असीम सरोदे यांच्या यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण...व्हॉटसॲप व फेसबुक या सोशल मीडियावर अधिक माहिती घेतल्यावर पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यावर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसला असल्याचे दिसत आहे. फोटो नीट पाहिल्यावर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नसून तो विजय माने याचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विजय माने हा नियमितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा व पोषाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा, अशा पद्धतीने वावरत होता. लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न विजय माने व इतरांनी करुन मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबत फोटो सोशल मीडियात व्हायरल करुन गैरसमज पसरविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बंडगार्डन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे अधिक तपास करीत आहेत.