कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ जून २०२४ रोजी घरातून जिमला गेलेली महिला घरी परत आलीच नाही. तिच्या हत्येचा आता चार महिन्यांनी पर्दाफाश झाला आहे. ३२ वर्षीय एकता गुप्ता कानपूर ग्रीन पार्क स्टेडियमच्या जिममध्ये जायची. २४ जून रोजी ती घरी न परतल्याने पतीने जिम ट्रेनर विमल सोनी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्याच दिवसापासून जिम ट्रेनरही बेपत्ता होता.
विमल सोनी याने एकताचं अपहरण केलं आहे किंवा ती स्वत:च्या इच्छेने त्याच्यासोबत गेली असल्याचा संशय पोलिसांना होता. चार महिन्यांनंतर म्हणजेच २६ ऑक्टोबर २०२४ रोजी आरोपी जिम ट्रेनरला पोलिसांनी अटक केली. विमल सोनीला पोलिसांनी पकडलं तेव्हा एकता त्याच्यासोबत नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल सोनी याने सांगितलं की, भांडणानंतर त्याने एकताची हत्या केली आणि डीएम कॉम्प्लेक्समध्ये खड्डा करून मृतदेह पुरला.
पोलिसांनी ही माहिती मिळताच तपास सुरू झाला. पोलीस फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोदकाम सुरू झालं. रात्री १२.३० वाजता खड्ड्यातून सांगाडा बाहेर आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोणताच पुरावा मागे ठेवला नव्हता. तो चार महिन्यांपासून फरार होता. पण त्याला पकडण्यात आता पोलिसांना यश आलं आहे.
एकताचा नवरा राहुल गुप्ता यांने सांगितलं की, मृतदेह सध्या फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेह सापडल्यानंतरही अनेक प्रश्न कायम आहेत. आरोपी जिम ट्रेनरने हे सर्व का केलं? त्याच्यासोबत आणखी कोणी होते का? मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींना कोणी मदत केली का? असे अनेक प्रश्न विचारले आहेत.