Crime News : दिल्लीच्या शाहदरा जिल्ह्याच्या जीटीबी एंक्लेव परिसरातून एक अजब घटना समोर आली आहे. एका वयोवृद्ध महिलेने पाणीपुरी खाण्यास नकार दिला म्हणून तिला धक्का देण्यात आला. ज्यात तिचा मृत्यू झाला. महिलेने जेव्हा पाणीपुरी खाण्यास नकार दिला तेव्हा शेजारील महिलेसोबत तिचा वाद झाला. यादरम्यान वयोवृद्ध महिलेला धक्का देण्यात आला. महिला डोक्यावर पडली आणि गंभीर जखमी झाली. महिलेची सून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. जिथे 68 वर्षीय शकुंतला देवीचा मृत्यू झाला.
एका रिपोर्टनुसार, याप्रकरणी सुनेने चार महिला आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. सूनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही महिलांना अटक केली.सूनेचा आरोप आहे की, तिची सासू दरवाज्याजवळ उभी होती. शेजारी राहणारी महिला शीतल हातांमध्ये पाणीपुरी घेऊन जात होती. शीतलने पाणीपुरी खाण्यास विचारलं तर शकुंतलाने नकार दिला. हे शीतला वाईट वाटलं आणि दोघींमध्ये वाद झाला.
यादरम्यान शीतलची आई आणि तिच्या दोन वहिन्याही तिथे आल्या. चौघींनी शकुंतलाला मारहाण सुरू केली. ती पडली, ज्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तिचा मृत्यू झाला. सूनेने सांगितलं की, शकुंतला हृदयरोगी होती.
पोलिसांनी सांगितलं की, जीटीबी एंक्लेवमध्ये शकुंतला आणि तिचा परिवार राहत होता. शकुंतलाची तीन मुले अवधेश कुमार, सुभाष आणि राजेश आहेत. शेजारीच आरोपी महिला शीतलचा परिवार राहतो. मुलगा राजेशची पत्नी बेबी शकुंतला हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिनेच शीतल व तिच्या परिवारावर आपली सासू शकुंतलाच्या हत्येचा आरोप लावला. पोलिसांनी नंतर चार महिलांना अटक केली. पुढील चौकशी सुरू आहे.