अहमदपूर ( जि. लातूर ) - गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदपूर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, एका ज्येष्ठ नागरिकांच्या घरात दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याची घटना अहमदपूर शहरात घडली. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र चारचाकी वाहन सोडून चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अहमदपूर येथील नागोबा नगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवसांब शिवप्रसाद खकरे (५९) आणि पत्नी शीला राहतात. मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास यांच्या घराचे दार लाथाबुक्क्यांनी तोडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या पत्नीच्या गळ्यावर चाकू ठेवत कपाटातील मंगळसूत्र, तीन तोळे बांगड्या, कानातील फुले, झुमके, सरपाळे, अंगठी, कानातील रिंग, चांदीचे कडे असा साडेचार लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला. दरम्यान, घडलेली घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
खकरे यांचे घर लोकवस्तीपासून दूर असून, त्यांच्या घरावर पाळत ठेवत चोरट्यांनी सदरचा ऐवज लुटला. दरम्यान, चाकूर येथे मंगळवारी पहाटेच २ वाजता एका जवानाच्या घरावर दरोडा टाकल्याची माहिती अहमदपूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी नाकाबंदी केली. अहमदपूर येथील आयटीआय जवळ चोरांचा पाठलाग केला, मात्र कार सोडून चोरट्यांनी पलायन केले. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.