जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: एरव्ही, सासूने सूनेला मारहाण केल्याच्या किंवा सूनेचा छळ केल्याच्या घटना नेहमीच पोलिस ठाण्यात येत असतात. परंतू, कोपरीमध्ये ७७ वर्षीय ज्योती दयारामानी या सासूलाच ५३ वर्षीय कोमल दयारामानी या सुनेने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी मंगळवारी दिली. या प्रकाराची व्हिडिओ क्लिपही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कोपरीतील नाखवा हायस्कूलजवळील सिद्धार्थ नगरातील साई तिर्थ या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. आपल्या तक्रारीमध्ये सासू ज्योती दयारामानी यांनी म्हटले आहे की, १४ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्या घरातील हॉलमधील सोफ्यावर बसलेल्या होत्या. त्यावेळी त्या अशक्त असल्याचे माहिती असूनही त्यांची सून कोमल यांनी त्यांना बेदरकारपणे पकडून हाताने तोंडावर जोराने फटके मारुन खाली खेचून ओढून फरफटत नेले. त्यामुळे त्यांच्या पाठीला, कमरेला दुखापत झाली. त्यानंतर ३ ऑक्टाेबर रोजी ज्योती या घरातील कॉमन वॉशरुम वापरण्यास गेल्या असता, कोमल यांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांच्या हाताला पकडून जोरदार खेचून खाली पाडले. त्यांनी सासूला शिवीगाळ करुन पोटात आणि पाठीवर बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गळा दाबून घरातून जाण्याची धमकीही दिली. या मारहाणीतही त्यांना चांगलाच मार लागला आहे.
याप्रकरणी कोमल यांनी कोपरी पोलिस ठाण्यात ९ ऑक्टाेंबर रोजी रात्री मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे वागळे विभागाचे सहायक पोलिस आयुक्त गजानन काब्दुले यांनी सांगितले. यातील आरोपी काेमल यांना नोटीस बजावली जाणार असून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल-
दरम्यान, यातील सूनेने सासूला मारहाण करीत असल्याचा तसेच घरातून बाहेर जाण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मंगळवारी मोठया प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे या घटनेविषयी ठाणे शहरातून संताप व्यक्त होत आहे.