ठाणे : वयोवृद्ध जिजाबाई केदार या महिलेची गळा चिरून हत्या केल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या नारायण विजयलाल केवट (२७) याच्यासह त्याला मदत करणारी त्याची आई सुभावती (४७) हिला श्रीनगर पोलिसांनी अटक केली. अवघ्या १२ तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला. चोरीच्या उद्देशाने हत्या केलेल्या मायलेकांना येत्या १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. वागळे इस्टेट, किसननगर नं. २, संजय गांधी नगर, शिवदेवी मंदिराच्या बाजूला, पाईपलाईनजवळ मृत जिजाबाई केदार (६५) आणि मारेकरी नारायण आणि त्याची आई सुभावती केवट हे शेजारीच राहतात. ५ सप्टेंबरपासून जिजाबाई हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मृत जिजाबाईच्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यावर पोलिसांनी घराचे कुलूप तोडले. घरामध्ये जिजाबाईचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या पथकाने कोणताही सुगावा नसताना मोठ्या कौशल्याने व चिकाटीने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणत मारेकऱ्याला अटक केली. या गुन्ह्याची माहिती असतानाही ती लपविण्यासाठी मदत करणारी मारेकऱ्याची आई सुभावती हिचा देखील गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यावर तिला अटक केली.
जिजाबाई परिसरात चालवायची भिशीजिजाबाई त्या परिसरात भिशी चालवत होती व सावकारीचे काम करीत असे, तिचा नवरा १५ वर्षांपासून बेपत्ता असल्याने ती एकटीच राहत होती. मारेकरी नारायण हा नशेबाज असून तो कोणताही कामधंदा करीत नसल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.