मीरा रोड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली असून, मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन राबवत कारवाया केल्या.
पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाडसह परिमंडळ १ मधील सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस अधिकारी - कर्मचारी यांनी ऑल आउट कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात आली होती.
ऑल आउट कोबिंग ऑपरेशनदरम्यान ५ वॉरंटमधील व फरारी २ आरोपी यांना अटक करण्यात आली.
अचानक नाकाबंदी अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली ११ गुन्हे दाखल करण्यात आले, तर १७ जणांवर सी.आर.पी.सी. १०७ प्रमाणे प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली. दारुबंदी कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल करण्यात आले. कोप्ताअंतर्गत १५ अदखलपात्र गुन्हे दाखल केले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १७ हिस्ट्रीशिटर यांची तपासणी केली. शहरात राहणारे ८ विदेशी नागरिक तपासले तर ७ तडीपार इसमाची माहिती घेण्यात आली. शहरातील ५४ ऑर्केस्ट्रा बार व लॉजेस तपासण्यात आले होते. पोलिसांनी १९ विविध ठिकाणी अचानकपणे नाकाबंदीचे लावली. नाकाबंदीच्या वेळी ३९७ संशयित वाहने तपासण्यात आली असून, मोटार वाहन कायद्यान्वये १४९ केसेस करण्यात आल्या आहेत.