मुंबई - संबंध भारतात निवडणुकीचे वारे असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह संबंध राज्यात रोख रक्कम, अमली पदार्थ आणि बेकायदा शस्त्र जप्तीचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. निवडणूक भरारी पथके आणि पोलिसंनी दारू, ड्रग्ज, शस्त्रे ताब्यात घेत कारवाई करण्यात आलेली आहे.
निवडणूक भरारी पथक आणि पोलिसांनी शनिवारी ४१ लिटर दारू, दीड किलो गांजा, चरस तसेच दोन कट्टे, पिस्तुलं आणि कोटींची रोख रक्कम जप्त केली आहे. मतदान होईपर्यंत ही धडक कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान होईपर्यंतच्या कालावधीत पैशाची देवाणघेवाण, ड्रग्ज, दारू यांच्या तस्करीचे प्रमाण वाढते. उमेदवारांमार्फत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नानाविध आमिषं दाखविली जातात. त्यामुळे निवडणूक आयोगाचे भरारी पथक, पोलीस यांनी कान्याकोपऱ्यात गस्त आणि नाकाबंदी अधिक वाढवली आहे. अलीकडेच शिवडीतून चार जणांना १२ लाखांच्या रोख रक्कमेसह पोलिसांनी ताब्यात घेऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी दिले आहे. तर बोरिवली पश्चिमेकडील गोरा गांधी हॉटेल येथे काहीजण शस्त्रांसह येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ७ चे उपनिरीक्षक अशोक चव्हाण यांना मिळाली. पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला. संशयास्पद हालचालीवरून संतोष विचारे, संजू जेना या दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीत त्यांच्याकडे दोन पिस्तूले आणि सहा जिवंत काडतुसे सापडली. अशा प्रकारे पोलिसांनी आणि भरारी पथकाने निवडणूका जस जश्या जवळ येत आहेत तस तश्या कारवाईचा चाप आवळण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई पोलिसांची कारवाई; दारु, अंमली पदार्थ आणि अवैध शस्त्र जप्त