गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. पुण्यातील ओला स्कूटरच्या आगीनंतर तमिलनाडूच्या वेल्लूरमध्ये दोन घटना घडल्या आहेत. यापैकी एका घटनेत वडिलांसह मुलीचा मृत्यू झाला आहे.
वेल्लूरमध्ये झालेल्या या हृदयद्रावक घटनेत घरातील छताखाली उभ्या असलेल्या इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागली. यामुळे घरात धूर पसरल्याने श्वास कोंडून एका व्यक्तीसह त्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. घरात एस्बेस्टसच्या छताखाली उभ्या केलेल्या स्कूटरला आग लागल्याने या दोघांचा मृत्यू झाला आहे.
तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, ४९ वर्षांचे एम दुरईवर्मा हे फोटो स्टुडिओचे मालक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी केली होती. त्यांनी घरातील एका जुन्या सॉकेटवर स्कूटर चार्जिंगला लावली आणि झोपायला गेले. इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली आणि अख्खे घर धुराने भरले.
या घटनेत दुरईवर्मा यांच्यासह त्यांची मुलगी मोहना प्रीतिचा देखील श्वास कोंडल्याने मृत्यू झाला. कमी व्होल्टेज असेल त्यामुळे स्कूटर चार्ज होऊ शकली नसेल आणि आग लागली असेल असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री १ वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी ही पेटती स्कुटर पाहिली आणि जवळच राहणाऱ्या दुरईवर्मा यांच्या बहीणीला याची कल्पना दिली.
आग मोठी असल्याने आणि धूर असल्याने शेजारी ती विझवू शकले नाहीत. बाजुलाच पेट्रोल बाईकदेखील होती. यामुळे कोणीच धाडस केले नाही. अखेर अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. त्यांनी समोरील दरवाजा तोडला आणि आत प्रवेश करत आग विझविली. आतमध्ये दोघांचे मृतदेह पडलेले होते. त्यांच्या शरीरावर जळालेल्याचे दिसत नव्हते. त्यांचा मुलगा जेवण केल्यानंतर नातेवाईकाकडे झोपायला गेला, यामुळे तो वाचला आहे. दुसऱ्या शहरात शिकायला असलेली मुलगी अनेक महिन्यांनी वडिलांना भेटण्यासाठी आली होती.