एल्गार परिषद: आरोपींच्या कुटुंबीयांना वैद्यकीय अहवाल द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:18 AM2020-08-26T02:18:48+5:302020-08-26T02:19:06+5:30
भारद्वाज यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. भायखळा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी, आरोपी असल्याने भारद्वाज यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सुधा भारद्वाज, डॉ. आनंद तेलतुंबडे व वेर्नोन गोन्साल्विस यांचे वैद्यकीय अहवाल त्यांचे कुटुंबीय, वकील आणि एनआयएला द्यावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
भारद्वाज यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. भायखळा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी, आरोपी असल्याने भारद्वाज यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यांना मधुमेह असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आहे, असे भरद्वाज यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
त्यावर सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी भारद्वाज यांचे २१ आॅगस्ट रोजी सादर केलेले वैद्यकीय अहवाल न्यायालयाला दाखवत म्हटले की, भारद्वाज यांची प्रकृती चांगली असून त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास त्यांना ते उपलब्ध करून देण्यात येतील.
भारद्वाज यांच्या प्रकृतीची माहिती घेणे, हा त्यांच्या कुटुंबीयांचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले. तर, डॉ. तेलतुंबडे व गोन्साल्विस यांच्या याचिकेवरील स्वतंत्र सुनावणीत ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले की, तेलतुंबडे यांचा कोरोना चाचणीचा सुधारित अहवाल शुक्रवारी सादर करू. न्यायालयाने या दोघांचेही वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबाला देण्याचे निर्देश दिले.