धायरी : पनवेल येथील एका क्वारंटाईनसेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार घडल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातल्या सिंडगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेला मध्यरात्री त्रास देणाऱ्या तेथील कर्मचाऱ्याने त्रास दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोकेश दिलीप मते (वय ३०, रा. राजयोग सोसायटी, धायरी, पुणे) या कर्मचाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी २७ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. सिंहगड कॉलेजमध्ये एकूण ५ हॉस्टेल प्रशासनाने ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहे. या ठिकाणी १५०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. १४ जुलै रोजी धायरी येथील २७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाच्या वतीने त्या महिलेस वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १६ जुलै रोजी सदर महिला कक्षात एकटी असताना येथील कर्मचारी लोकेश मते हा या महिलेच्या खोलीत गेला. व आपण सुरक्षाच्या कारणास्तव आल्याचे सांगून त्यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याने या महिलेस मिस्ड कॉल केला. काही वेळाने त्याने आपल्याला काही अडचण असल्यास सांगा असा मेसेज करून त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच फोन करून अश्लील भाषेत बोलला. त्यानंतर त्याने सदर महिलेचा दरवाजा पहाटेपर्यंत ठोठावला. घाबरून जाऊन सदर महिलेने १०० नंबरला फोन करून मदत मागितली असता रात्रपाळीत असणाऱ्या मार्शलनी आमच्याकडे पीपीई किट नसल्याने आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नसल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडीत महिलेच्या नातेवाईकांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर या महिलेची दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. मात्र या निमित्ताने कोविड सेंटरमधील महिला रुग्णांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुण्यातील कोविड क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेला त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 1:07 PM
पुण्यातल्या सिंडगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमध्ये ही महिला उपचार घेत आहे.
ठळक मुद्देयाप्रकरणी २७ वर्षाच्या महिलेने दिली फिर्याद