मुंबई : अनेकदा साहेबांच्या आदेशाने पैशांची वसुली होते. मात्र, साहेब बाजूला राहून कर्मचारीच अडकताना निदर्शनास आले आहे. यावर्षीच्या कारवाईत ‘क्लास थ्री’ चे सर्वाधिक ५२० कर्मचारी यामध्ये अडकले आहेत. एसीबीने यंदा केलेल्या कारवाईमध्ये १,०३० जण सापळ्यात अडकले. त्यात क्लास वन (४७), क्लास टू (१२३), क्लास थ्री (५२०), क्लास फोर( ३९), खासगी (१५०) कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ७६ क्लास वन अधिकारी जाळ्यात अडकले होते. लाच घेणे व देणे गुन्हा आहे असा फलक प्रत्येक शासकीय कार्यालयात लावणे बंधनकारक असल्याने तो ठिकठिकाणी नजरेत पडतो. मात्र, हे फलक नावालाच असल्याचे कारवाईतून स्पष्ट होत आहे.
लाच मागितली तर येथे साधा संपर्क...लाच मागणे जसा गुन्हा आहे तसेच देणेदेखील गुन्हा असल्याचे एसीबीचे म्हणणे आहे. कोणी लाच मागत असल्यास तत्काळ एसीबीकडे धाव घ्या किंंवा एसीबीच्या १०६४ हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीकड़ून करण्यात येत आहे.