Chhattisgarh Naxalites killed : गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहिम तीव्र केली आहे. या मोहिमांमध्ये अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. आता आजही(दि.3) छत्तीसगडच्या दंतेवाडा-विजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील लोहगाव पेडियाच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार(3 सप्टेंबर) रोजी सुरक्षा दलाने परिसरात शोध मोहिम राबवली होती. यादरम्यान त्यांना पश्चिम बस्तर विभागात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली. यानंतर सकाळी 10.30 वाजता चकमक सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी भीषण गोळीबार झाला. या चकमकीत जवानांनी आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून, घटनास्थळावरुन एसएलआर, 303 आणि 12 बोअरची शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी याला दुजोरा दिला आहे.
यापूर्वी 3 नक्षलवादी ठार यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी नारायणपूर-कांकेर सीमेवर नक्षलविरोधी अभियानांतर्गत नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. दरम्यान, ऑगस्टमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून अनेक नक्षलवाद्यांना पकडले, तर अनेकांना ठारही केले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाही दंतेवाडा पोलिसांना मोठे यश मिळाले होते. चकमकीत एक कट्टर नक्षलवादी ठार झाला होता.
65 नक्षलवादी लपून बसल्याचा संशय अधिकाऱ्यांनी सांगितले की, 5 ते 7 किमीच्या परिसरात सूमारे 65 नक्षलवादी लपून बसल्याचा संशय आहे. सध्या या संपूर्ण परिसराला घेराव घातला असून, शोध मोहिम राबवली जात आहे. विशेष म्हणजे, बस्तर प्रदेशात दंतेवाडा आणि विजापूरसह सात जिल्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, या वर्षात आतापर्यंत छत्तीसगडमध्ये विविध चकमकीत सुरक्षा दलांनी 154 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.
2026 पर्यंत नलक्षलवाद संपवणार- अमित शाहकाही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील नक्षलवाद संपवण्याची घोषणा केली होती. बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि बऱ्याच अंशी महाराष्ट्र नक्षलवाद्यांच्या समस्येपासून मुक्त झाला आहे. नक्षलवादी हल्ल्यांमध्ये 54 टक्के घट झाली आहे. नक्षलवाद हे लोकशाही व्यवस्थेसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळेच आता नक्षलवादावर अंतिम हल्ल्याची वेळ आली आहे. 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद संपवणार, असे शाह म्हणाले होते.