गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागातील छत्तीसगड सीमेजवळील परिसरात शनिवारी सकाळपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यात ५ पेक्षा जास्त नक्षलवादी ठार झाले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
दुपारपर्यंत ही चकमक सुरूच होती. काही मृत नक्षलींचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे शिबिर उद्ध्वस्त केल्याचे कळते. पोलिसांचे ऑपरेशन अजून संपलेले नसल्यामुळे त्याबाबत अधिक माहिती सांगता येणार नसल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती, कोटगुल परिसरातील जंगलात नक्षल्यांचे शिबिर लागले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र करत त्या भागाकडे मोर्चा वळविला. पोलिसांच्या पथकाची चाहुल लागताच नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेतला. या चकमकीत पोलिसांच्या गोळीने काही नक्षलवाद्यांचा वेध घेतला.