सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका भंगार गल्लीतील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचारी व भंगार दुकानदारात सोमवारी राडा होऊन हाणामारी झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन चौघांना अटक केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील काजल पेट्रोल पंप परिसरातील भंगार गल्लीतील रस्त्यावर भंगार दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तश्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या अतिक्रमण पथकाने सोमवारी भंगार गल्लीत जाऊन रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्थानिक भंगार दुकानदारांनी कारवाईला विरोध केल्यावर, महापालिका कर्मचारी व भंगार दुकांदार एकमेका समोर उभे ठाकून शिवीगाळ व धक्काबुकीं झाली. त्यानंतर तुफान हाणामारी झाली. महापालिका कर्मचारी व भंगार दुकानदारातील हाणामारी व राड्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. भंगार गल्लीतील कारवाई दरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात काही जनावर गुन्हा दाखल झाला असून चौघांना अटक झाल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
शहरातील बहुतांश रस्त्यावर अतिक्रमण झाले त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र कारवाई दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण होत असेलतर, अश्या दुकानदारावर सक्त कारवाई करण्याची मागणी होत आहे. नेहरू चौक, शहाड रेल्वे स्टेशन परिसर, कॅम्प नं-४ व ५ परिसरातील मार्केट रस्ता, शिरू चौक, जपानी व गजानन कपडा मार्केट परिसरात असेच फुटपाथ व रस्त्यावर दुकानदार व फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र आहे.