नवी मुंबई - बांधकाम व्यवसायिक प्रवीण तायडेंच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या तिघांकडून दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत. घटनेच्या दिवशी जयेश पाटील व साथीदार दारूच्या नशेत होते. त्याचवेळी एकटा प्रवीण त्यांच्या नजरेस पडल्याने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली होती.गुरुवारी तळवली येथे भरदिवसा गोळीबाराची घटना घडली होती. त्यामध्ये प्रवीण तायडे (35) या बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाली होती. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत. जयेश पाटील (37), संतोष डोरा (22) व देवेंद्र माळी (22) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी जयेश व संतोष यांनी घटनेवेळी गोळीबार केला होता. सहा महिन्यांपासून जयेश व प्रवीण यांच्यात वाद वाद सुरु होते. त्यावरून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती देखील प्रवीण याने घरी व्यक्त केली होती. त्यामुळेच तो अनेक दिवसांपासून घराच्या बाहेर देखील निघत नव्हता. परंतु घटनेच्या दिवशी तळवली येथील बांधकामाच्या ठिकाणची पाण्याची मोटर बंद पडल्याने प्रवीण त्याठिकाणी आला होता. यावेळी जयेश व साथीदारांची त्याच्यावर नजर पडली. प्रवीण सोबत नेहमी काही साथीदार असायचे. परंतु त्यादिवशी तो अनोळखी व्यक्तीबरोबर एकटाच असल्याची संधी त्यांनी साधली. त्यानुसार प्रवीणच्या मोटरसायकलला कारने धडक देऊन खाली पाडल्यानंतर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये एक गोळी प्रवीणच्या डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर त्यांनी कोपर खैरणेत कार सोडून पसार झाले होते. त्यांच्या शोधासाठी परिमंडळ उपायायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त विनायक वस्त, वरिष्ठ निरीक्षक योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, उमेश गवळी, अंकुश चिंतामण, सोपान नांगरे, तुकाराम निंबाळकर, विश्वास चव्हाणके, प्रवीण फडतरे, उपनिरीक्षक अमित शेलार, रमेश चव्हाण, हवालदार रश्मीन, मगर, अतिश कदम, किरण जाधव, अनिल मोटे, प्रकाश जाधव, अमोल भोसले, सिद्धेश्वर माळी, जयदीप पवार, अर्जुन गीते, दर्शन कटके, किरण राऊत यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांना जयेश व त्याचे साथीदार खारघर परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रविवारी दुपारी त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. अंग झडतीमध्ये त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे व सहा काडतुसे आढळून आली आहेत. न्यायालयाने त्यांना 15 जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर चौकशीत त्यांनी व्यावसायिक वादातून हत्या केली असल्याचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या :
धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत
खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल
३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत
आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित
उमरग्यात खून करुन पुण्यात आलेल्या दोघांना अटक
लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट