नवी दिल्ली - अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) टेरर फंडिंग केसप्रकरणी दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनच्या काश्मीरमधील संपत्तीवर टाच आणली आहे. ही संपत्ती जम्मू - काश्मीरमधील अनंतनाग, बारामुल्ला आणि बांदीपुरा जिल्ह्यातील आहे. ईडीने हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एकूण १.२२ कोटींची संपत्ती जप्त केली असून ही तीन जिल्ह्यातील संपत्ती ७ वेगवेगळ्या दहशतवाद्यांच्या नावे असल्याचे उघडकीस आले आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सईद सलाउद्दीनच्या मालकीच्या १३ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मार्च महिन्यात ईडीने दिले होते. या सर्व मालमत्ता जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. सलाउद्दीन पाकिस्तानात वास्तव्याला असून भारतातील दहशतवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा केल्याने त्याच्या सर्व मालमत्तांवर टाच आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. सलाउद्दीन याच्यासह बांदीपुरातील मोहम्मद शफी शहा तसेच अन्य सहा जणांच्या मालकीची १.२२ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता जप्त करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले होते. मोहम्मद शफीसह ज्या सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे ते सर्वजण दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याची ईडीची माहिती आहे. या सर्वांविरुद्ध आरोपपत्र दाखल असून त्याआधारेच कारवाई करण्यात आली आहे.काश्मीरमधील दहशतवादी कारवाया तसेच फुटिरतावाद्यांना आर्थिक रसद पुरवण्याचे काम हिजबुल मुजाहिदीनकडून केले जात आहे. या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सईद सलाउद्दीन पाकिस्तानातील रावळपिंडी येथे आश्रयाला असून 'जकार्त'च्या (जम्मू अँड काश्मीर अफेक्टीज रीलिफ ट्रस्ट) आडून तो भारतात दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत असल्याचे ईडीने जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते. सलाउद्दीनला पाकमधील अन्य दहशतवादी संघटनांसह आयएसआयचेही पाठबळ असून हवाला तसेच अन्य माध्यमातून तो भारतात पैसे पाठवत असल्याचे उघडकीस आले आहे.
ईडीने हिजबुलच्या काश्मीरमधील संपत्तीवर आणली टाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 6:24 PM
तीन जिल्ह्यातील संपत्ती ७ वेगवेगळ्या दहशतवाद्यांच्या नावे असल्याचे उघडकीस आले आहे.
ठळक मुद्दे. ईडीने हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एकूण १.२२ कोटींची संपत्ती जप्त केली ही तीन जिल्ह्यातील संपत्ती ७ वेगवेगळ्या दहशतवाद्यांच्या नावे असल्याचे उघडकीस आले आहे.