मडगाव: न फेडलेल्या दहा लाखांची वसुली करण्यासाठी एएन गॅस लाईन प्रोजेक्टस् या कंपनीचा व्यवस्थापक असलेला अभियंता अंबरिश प्रताप सिंग याचे नुवे येथून अपहरण केलेल्या आरोपीला शेवटी शिर्शी (कर्नाटक) येथे अटक करण्यात आली. यासंदर्भात मडगावचे उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांनी त्वरित हालचाल केल्याने अवघ्या आठ तासात आरोपी पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणात मायणा कुडतरी पोलिसांनी मुख्य आरोपी महमद मुश्ताफा याच्यासह तिघांना अटक केली.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मंगळवारी सायंकाळी ही अपहरणाची घटना घडली. दिल्लीतील एएन गॅस लाईन्स या कंपनीकडून सध्या नुवे येथे गॅस वाहिनी बसविण्याचे काम चालू असून याच कंपनीकडून यापूर्वी तामिळनाडू येथील रामेश्र्वरम येथे काम हाती घेतले होते. सुरतकल (कर्नाटक) येथील महमद मुश्ताफा याने या कंपनीसाठी काम केले होते. या कंपनीकडून त्याचे दहा लाख रुपये येणो बाकी होते.
आपल्या या देय रक्कमेची वसुली करण्यासाठी संशयित मुश्ताफा हा गाडी घेऊन मंगळवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान नुवे येथे दाखल झाला. यावेळी त्याने प्रकल्प व्यवस्थापक अंबरिश प्रताप सिंग याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. नंतर त्याला काळ्या रंगाच्या होंडा सिटीत कोंबून तो तिथून निघून गेला. ही घटना या कामावर सुपरवायजर म्हणून असलेल्या शिवम सिंग याने पाहिल्यावर त्याने त्वरित आपल्या दिल्लीतील कंपनीशी संपर्क साधला. दिल्लीतून त्याला एका माणसाचा फोटो पाठविण्यात आला. अपहरण करणारी व्यक्ती हीच का असे त्याला विचारण्यात आले. फोटोतील व्यक्तीनेच सिंग यांचे अपहरण केल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले. दरम्यान पर्यावेक्षकाने सिंग यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता आपण लवकरच परत येऊ असे त्याला सांगण्यात आले. मात्र रात्री 10 र्पयत तो परत न आल्याने शेवटी मायणा कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली.
गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो उपअधीक्षक राऊत देसाई त्यावेळी पोलीस ठाण्यातच उपस्थित होते. त्यांनी त्वरित या घटनेचा मागावा घेत चौकशी सुरु केली असता सिंग याची अपहरण केलेली कार कर्नाटकच्या दिशेने निघाल्याचे त्यांना कळून चुकले त्यांनी कर्नाटक पोलिसांनी सतर्क करीत नाकाबंदी करायला लावली. दरम्यान, या घटनेचा तपास करण्यासाठी निरीक्षक प्रविणकुमार वस्त यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक करिष्मा प्रभू, तेजसकुमार नाईक, संजीत कांदोळकर, सहाय्यक उपनिरीक्षक सी. जी. वेळीप, पोलीस शिपाई सोमनाथ नाईक, विकास नाईक, किशोर गावकर, सागर गावकर, मीनार देसाई, बाळू जामदार व सिद्धेश पागी यांना कामाला लावले.
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास सदर गाडी शिर्शी बाजारातून जाताना शिर्शी पोलिसांना दिसल्यावर त्यांनी ती अडवून संशयिताला ताब्यात घेतले. या गाडीत एकूण तीन संशयित होते. उपनिरीक्षक संजीत कांदोळकर यांनी नंतर शिर्शी येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.