उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर २९ मधील कोतवाली भागातील सदरपूर गावात अनोखी घटना उघडकीस आली आहे. एका मजुराने घराबाहेर उभी असलेल्या मर्सिडीज कारवर पेट्रोल टाकून ती कार जाळून दिली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित घटना समोर आली.
सदरपूर गावांतील एका घराबाहेर रस्त्यावर पांढऱ्या रंगाची कार उभी होती. त्यावेळी, एक बाईकस्वार समोर येतो आणि कारपासून काही अंतरावर आपली दुचाकी उभी करतो. त्यानंतर, बाईकवर अडकविण्यात आलेलं कॅन हातात घेऊन त्यांतील पेट्रोल समोर उभा असलेल्या कारवर टाकून त्या कारला आग लागतो असे या व्हायरल व्हिडिओत दिसून येते. ही संपूर्ण घटना ३२ सेकंदांची असून कारला आग लागताच आरोपीने तेथून पळ काढल्याचेही दिसून येते.
टाईल्स बसवणाऱ्या कामगाराने पावणे तीन लाख रुपयांच्या वादातून या कारला आग लावल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली. अद्याप याप्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी हा बादलपूरचा रहिवाशी आहे. एसीपी रजनशी वर्मा यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीच्या कारला आग लावण्यात आली, त्याही व्यक्तीचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर, कारला आग लावणारी व्यक्ती ग्रेटर नोएडाच्या रोजा जलालपुर गांवातील रहिवाशी असून त्याचं नाव रणवीर आहे. रणवीर मूळ बिहारचा रहिवाशी आहे.
रणवीर हा घरामध्ये टाईल्स लावण्याचं काम करतो, आरोपीने तपासदरम्यान पोलिसांना असे सांगितले की, सदरपूर निवासी पियुष चौहानने त्याच्या घरी टाइल्स फरशी लावली होती. त्यातूनच रणवीरचा आयुषवर २.३८ लाख रुपयांचा बोजा होता. त्यामुळे, अनेकदा त्याने पैशांची मागणी पियुषकडे केली. त्यातूनच त्याने कारला आग लावली. दरम्यान, आपण रणवीरला संपूर्ण पैसे दिले होते, असा दावा पियुषने केला आहे.