मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकाविल्याप्रकरणी नांदेडच्या विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांविरुद्ध मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहविभागाला ५ ऑक्टोबरला हे पत्र मिळताच, ते पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांकडे पाठविण्यात आले. त्यानुसार गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु आहे. मंत्रालयात घुसून ठार मारू, अशा आशयाचा धक्कादायक मजकूर पत्रात लिहिण्यात आल्याने फडणवीस यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचे नाव, मोबाईल क्रमांक पत्रात नमूद केले आहे. संतोष कदम असे त्याचे नाव असून तो नांदेडच्या विरोधी पक्षातील कार्यकर्ता आहे. ’तुम्ही नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवून तसेच आमिष दाखवून पक्षांतर घडवून आणत आहात. आपण अनेक पक्ष फोडले आहे, हे काही मला पटलेले नाही. आपल्या सरकारने राबवलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशात आर्थिक मंदीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या व्यापारी कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मी निष्ठावंत कार्यकर्ता असून माझ्या गावात जो कोणी तुमच्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरकेल तसेच भाजपाचा झेंडा हातात दिल्यास व ईडीची भीती दाखविल्यास मंत्रालयात घुसून ठार मारू,’ अशा आशयाचा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे. त्यानुसार, फडणवीस यांच्या सुरक्षेतही अधिक वाढ करण्यात आली आहे.