पटना – कुठल्याही राज्यातील पोलीस विभागातील भ्रष्टाचाराच्या बातम्या नेहमी समोर येत असतात. अलीकडेच एका कॉन्स्टेबलच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने धाड टाकल्यावर सगळेच अधिकारी चक्रावले आहेत. खबरीकडून मिळालेल्या माहितीच्या हवाल्याने अधिकाऱ्यांनी कॉन्स्टेबलच्या घरावर छापा टाकला तेव्हा हैराण करणारा प्रकार समोर आला. ही घटना बिहारची आहे जिथं माजी डीजीपी अभयानंद यांनी प्रशासकीय भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकलं आहे.
बिहारमधील सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बेनामी संपत्तीवर आर्थिक गुन्हे शाखेने लक्ष्य केंद्रीत केले आहे. आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांच्या घरी छापेमारी केल्यानंतर बिहारमधील एका कॉन्स्टेबलच्या घरी अधिकाऱ्यांनी धाड टाकली. पटना पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कॉन्स्टेबल नरेंद्र कुमार धीरज यांच्या ९ ठिकाणांवर एकाचवेळी छापे मारले. तेव्हा कॉन्स्टेबल नरेंद्र कुमार धीरजनं पदाचा गैरवापर करून स्वत:च्या आणि नातेवाईकांच्या नावावर कोट्यवधीची संपत्ती गोळा केल्याचं दिसून आलं. उत्पन्नापेक्षा अनेक पटीने जास्त कमाई करणाऱ्या नरेंद्र कुमार धीरजविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
नातेवाईकांच्या नावावर संपत्ती
कॉन्स्टेबल नरेंद्र कुमार धीरज याच्याविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत चौकशी करत छापेमारी केली. त्यानंतर सोमवारी या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नरेंद्र कुमारनं स्वत:च्या आणि नातेवाईकांच्या नावावर बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.
प्रशासनात खळबळ
कॉन्स्टेबल नरेंद्र कुमार धीरज हा पटनातील आरा गावातील रहिवासी आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या छापेमारीनंतर प्रशासनात खळबळ माजली. आरामध्ये धीरजच्या भावांच्या नावावर अनेक फ्लॅट आणि जमिनी असल्याचं उघड झालं. पटनाच्या बेऊन परिसरातील महावीर कॉलनीत कॉन्स्टेबलचं अलिशान घर पाहून अधिकारी हैराण झाले. या घरात अनेक बहुमुल्य वस्तू सापडल्या. या पोलीस कॉन्स्टेबलचे अनेक प्रभावी लोकांसोबत चांगले संबंध आहेत.
गेल्यावर्षीही पोलिसांवर कारवाई
कर्तव्यात हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचारात गुंतलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर सतत करडी नजर ठेवली जात आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये ८५ पोलिसांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बडतर्फ करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेकडो पोलिसांविरुद्ध तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी माजी डीजीपी अभयानंद यांनी स्वतःच्या अनुभवाबद्दल ज्या गोष्टी शेअर केल्या होत्या त्या पोलीस विभागात चर्चेचा विषय बनल्या होत्या. भ्रष्टाचार संपवण्यासाठी व्यवस्थेतील बदलांविषयी ते बोलले. आपल्या अनुभवांचा हवाला देत ते म्हणाले होते की एका व्यक्तीला एकाच ठिकाणी दीर्घकाळ पोस्ट करणे ही भ्रष्टाचाराची जननी आहे. अशा परिस्थितीत कॉन्स्टेबलची कोट्यवधीची संपत्ती आढळणं हे पोलीस विभागातील भ्रष्टाचाराचं उदाहरण म्हणून पाहिलं जात आहे.