आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing) मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका कनिष्ठ शास्त्रज्ञाच्या (Junior Scientist) घरावर छापा (Raid) टाकला. यावेळी कथितरित्या 30 लाख रुपयांच्या रोख रकमेसह जवळपास 7 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
सुशील कुमार मिश्रा असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सुशील कुमार मिश्रा याच्या सतना येथील मारुती नगर येथील घरावर छापेमारी केली. याबाबत रीवा लोकायुक्त एसपी वीरेंद्र जैन यांनी सांगितले की, "सर्च वॉरंट मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सतना जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कनिष्ठ शास्त्रज्ञ सुशील कुमार मिश्रा याच्या सतना येथील मारुती नगरमधील घराची झडती घेतली."
या छापेमारी दरम्यान 30,30,880 रुपये रोख रक्कम, 10 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, 21 बँक खाती, 4 विमा पॉलिसी आणि जवळपास 1.76 कोटी रुपये किमतीचे 29 भू-रजिस्ट्री कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे विरेंद्र जैन यांनी सांगितले. ही जमीन मिश्रा यांनी स्वत: पत्नी सुमन मिश्रा आणि मुलगा ज्ञानेंद्र मिश्रा यांच्या नावावर सतना शहर आणि शहरालगतच्या परिसरात घेतली होती. भोपाळच्या जमिनींची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
चौकशीत शास्त्रज्ञ निघाला करोडपती आरोपी सुशील कुमार मिश्रा याचे मारुती नगरमध्ये दुमजली घर आहे, ज्याची किंमत अंदाजे 37.50 लाख रुपये आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, आरोपीचे सतना शहराजवळ सात एकरांचे फार्महाऊस असून त्यात १५०० स्क्वेअर फूटमध्ये घर बांधले आहे. आरोपींकडून एक ट्रॅक्टर, एक महिंद्रा एसयूव्ही, एक स्कॉर्पिओ, एक इंडिका कार, 3 मोटारसायकल आणि इतर कागदपत्रे सापडली आहेत. या वाहनांची किंमत 50 लाखांहून अधिक आहे, असेही विरेंद्र जैन यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, टीआय मोहित सक्सेना आणि प्रवीण चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखालील 25 सदस्यीय ईओडब्ल्यू टीमने या शास्त्रज्ञाच्या घरावर छापा टाकला.