- जितेंद्र कालेकरठाणे : तब्बल दोन हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणात सहआरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपली गोठवलेली बँक खाती पुन्हा खुली करण्यास ठाणे विशेष न्यायालयाकडे मागणी केली होती. तिचा हा अर्ज ठाणे न्यायालयाने सोमवारी फेटाळला असून बँक खाती आणि तिच्या सदनिका खुल्या करण्यासही विरोध दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे विशेष सत्र न्यायालयात अभिनेत्री ममता हिच्या वकिलांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, २०१६ मध्ये चुकीने तिचे इफेड्रीन प्रकरणात नाव गोवले गेले आहे. तिच्या कुटुंबात ती एकमेव कमवती आहे. तिच्या एका बहिणीवर नवी मुंबईतील पनवेल येथील एका केंद्रावर गेल्या आठ वर्षांपासून उपचार सुरू आहेत. तिची सर्व बँक खाती आणि ठेवी या न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी गोठविल्या आहेत. बँक खाती गोठवल्यामुळे बहिणीच्या वैद्यकीय उपचारांसाठी औषधे तसेच इतर खर्च करणेही आपल्याला शक्य होत नाही. याच बहिणीला चांगल्या स्वच्छ निरोगी वातावरणात ठेवण्यासाठी मुंबईच्या अंधेरीतील दोन सदनिकाही खुल्या केल्या जाव्यात, अशी मागणी तिने ठाणे न्यायालयात एक महिन्यापूर्वी दिलेल्या अर्जात केली आहे. हाच अर्ज २ ऑगस्ट २०२१ रोजी ठाणे न्यायालयाने फेटाळून या गुन्ह्यांची तीव्रता मोठी असल्याने बँक खाती आणि तिच्या अंधेरीतील दोन्ही सदनिका पुन्हा खुल्या करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ममताला सध्या तरी आपली बँक खाती कायदेशीररीत्या खुली होण्याची आणखी वाट पाहावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काय होते प्रकरण? कथित ड्रगमाफिया विकी गोस्वामीला कोट्यवधी रुपयांच्या इफेड्रीनची देशविदेशात तस्करी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप अभिनेत्री ममता हिच्यावर आहे. त्यामुळेच तिची भारतातील सर्व बँक खाती जुलै २०१६ मध्ये गोठविली आहेत. त्यावेळी तिच्या बँक खात्यात ८० ते ९० लाखांची रक्कम जमा होती. विकीसह ममता, अशा चौघांविरुद्ध रेड कॉर्नरची नोटीसही बजावली होती. विकी गोस्वामी आणि एव्हॉनचा संचालक मनोज जैन यांच्याबरोबर ८ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या बैठकीत ममता सामील झाल्याचे पोलिसांना पुरावे मिळाले होते. त्यानंतरच तिच्या बँक खात्यांची चौकशी पोलिसांनी केली. यात एका खात्यातून विकीची बहीण रिटाच्या खात्यामध्ये दोन कोटी रुपये वळते झाले आहेत. त्यावरूनच रिटाचीही पोलिसांनी चौकशी केली होती. तिनेही आपल्यावरील आरोपांचा इन्कार करीत केवळ चांगली मैत्रीण असल्यामुळेच व्यवसायासाठी आपल्याला ममताने हे पैसे दिल्याचा दावा केला होता.
असा आहे ममताच्या बँक खात्यांचा तपशीलपोलिसांच्या दाव्यानुसार ममताची मडापो (भूज, गुजरात), कालवाड रोड (राजकोट, गुजरात), बदलापूर (ठाणे, महाराष्ट्र) येथील अॅक्सिस बँकांच्या शाखांमध्ये २६ लाखांची रोकड आहे. मालाड मुंबईच्या शाखेत एक लाख अमेरिकन डॉलर्स (६७ लाख रुपये भारतीय चलन) अशी सुमारे ९३ लाखांची रक्कम २०१६ मध्ये होती. हीच खाती सील असल्यामुळे ममता किंवा तिच्या नातेवाइकांना तिथून पैशांचे व्यवहार करता येत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.