बीड : चार लाखांचा गुटखा घेऊन निघालेली जीप पकडून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन आरोपींसह मुद्देमाल पेठ बीड पोलिसांच्या स्वाधीन केला. मळमळत होत असल्याचा बहाणा करुन त्या दोघांनी पोबारा केला. २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता हा प्रकार घडला.
शेख मोहसीन शेख सलाउद्दीन (२८,रा.खाजानगर, मोमीनपुरा, बीड) व शेख इकबाल शेख रशीद (रा.मिल्लतनगर, मोमीनपुरा, बीड)अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख व सहायक निरीक्षक विलास हजारे हे २७ रोजी शहरात गस्त घालत होते. बार्शी रोडने मालवाहू जीपमधून (एमएच २० सीटी-३५१७) गुटखा मोमीनपुरा येथे जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशाने त्यांनी बार्शी नाका येथे सापळा रचला.
यावेळी जीप थांबविताच चालकाने उडी मारुन पोबारा केला. पथकाने शेख मोहसीन शेख सलाउद्दीन व शेख इकबाल शेख रशीद यांना पकडले. या दोघांसह शेख राजू शेख इलियास व शेख सोनू शेख बादल (दोघे रा.महंमदिया कॉलनी, बीड) यांच्यावर सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्या फिर्यादीवरुन पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
जीप पकडून झडती घेतली तेव्हा त्यात ८ लाख ८२ हजार २५० रुपयांचा गुटखा आढळला, चार लाखांच्या जीपसह १२ लाख ८२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल सायंकाळी सहा वाजता पोलिसांच्या स्वाधीन केला. दरम्यान, ठाणे अंमलदार संजयकुमार राठोड यांनी दोन्ही आरोपींना बाकड्यावर बसवले.
दोघांसाठी दुचाकी होती तयारसायंकाळी साडेसहा वाजता शेख इकबाल याने उलट्या - मळमळ होत असल्याचे सांगितले. त्यामुळे ठाणे अंमलदार संजयकुमार राठाेड यांनी त्यास बाहेर आणले. यावेळी हिसका देऊन तो पळाला. यावेळी शेख मोहसीननेही धूम ठोकली. दोघांनी एकामागोमाग एक पलायन केले. राठोड यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीच्या दुचाकीवरुन ते पळून गेले. संजयकुमार राठोड यांच्या फिर्यादीवरुन पळून गेलेल्या दोन आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्रूा अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा नोंदविण्यात आला.
दोन आरोपींनी पलायन केल्यानंतर रात्रभर त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याचा स्वतंत्र गुन्हा नोंद केला आहे. त्यांचा शोध सुरु आहे. लवकरच अटक केली जाईल.- संतोष वाळके, उपअधीक्षक, बीड