कल्याण : मुंबई नाकाबंदी दरम्यान पसार झालेल्या दोन सराईत चोरटयांना कल्याण खडकपाडा पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. सुनील उर्फ सोन्या फुलारे गणेश जाधव असे अटक करण्यात आलेल्या दोन चोरट्यांची नावे असून या टोळीचा मुख्य सूत्रधार अब्दुल्ला इराणी हा पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून ११ मोटरसायकल आणि १५ ग्रॅम सोन्याचा ऐवज असा एकूण दहा लाख वीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हे त्रिकूट मुंबई, ठाणे , भिवंडी नवी मुंबई परिसरात चैन स्नेचिंग, दुचाकी चोरी करत होते. धक्कादायक बाब म्हणजे अब्दुल्ला इराणी व सोन्या फुलारे हे दोघे मुंबई चुनाभट्टी येथे देखील पोलिसांना चकवा देत तिथून पसार झाले होते. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी हटकल्याने त्यांनी पोलिसांना देखील चाकू दाखवत धुम ठोकल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे .
कल्याण परिसरात होणाऱ्या चैन स्नेचिंग व दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कल्याण परिमंडळ 3 मध्ये पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील संशयित आरोपी हे कल्याण जवळ असलेल्या मोहने लहुजी नगर परिसरात येणार असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गायकवाड यांच्या पथकाने लहुजी नगर परिसरात सापळा रचत या दोन्ही चोरट्यांना अटक केली.
सुनील उर्फ सोन्या फुलारे व गणेश जाधव अशी या दोन चोरट्यांची नावे आहेत. या दोघांची कसून चौकशी केली असता या दोघांकडून जबरी चोरी आणि मोटरसायकल चोरीचे तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले आहेत. या दोघांचा मोरक्या आंबिवली परिसरात राहणारा अब्दुल्ला इराणी असून तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुंबई, भिवंडी, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरात चोरी करत असल्याचे माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली.
तपासा दरम्यान मुंबईतील चुनाभट्टी येथे पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान सोन्या व अब्दुल्ला इराणी हे दुचाकीवरून येत असताना पोलिसांनी त्यांना हटकले असता या दोघांची दुचाकी स्लिप झाली. त्यानंतर पोलिसांना चाकूचा धाक दाखवत हे दोघेही तेथून पसार झाले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात देखील कैद झाली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला होता.
या त्रिकूटाविरोधात कल्याण खडकपाडा , शीळ डायघर ,राबोडी ,मुंब्रा, नारपोली ,उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलीस ठाणे, बदलापूर पोलीस ठाणे, खडकपाडा, टिळक नगर ,शिवाजीनगर, अंबरनाथ, चुनाभट्टी पोलीस ठाणे, सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे शांतीनगर पोलीस ठाणे असे तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत.