राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरु होणार असून यासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना सहकार्यासाठी आवाहन केले. मात्र, जोपर्यंत नियमांचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत पोलिसांनी लाठीचा वापर करू नये असे सांगितले. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होत असेल तर बळाचा, लाठीचा वापर होईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तसेच अत्यावश्यक वाहतुकीस पासची गरज नसल्याचे सांगत पांडे यांनी अत्यावश्यक कामास निघणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला आहे.
जगभर पसरलेल्या कोरोना महामारीशी आपल्याला लढा द्यायचा आहे. हा लढा आपण तुमच्या सहकार्याने यशस्वी करूया. पोलीस देखील यासाठी सज्ज आहेत. राज्यातीलएकूण ८१ टक्के पोलिसांचे दोन्ही टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. मास्क वापरा, हात सॅनिटाईझ करा. शक्यतो अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. आपण आपली स्वतःची काळजी घ्या. कलम १४४ लागू होणार असून ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमू शकत नाहीत. मात्र, निमय मोडले तर लाठीचा वापर केला जाईल, असा इशारा देखील पांडे यांनी विनाकारण फिरणाऱ्यांना दिला आहे.
राज्यात १३२८० हजार होमगार्ड आणि SRPF २२ कंपन्या राखीव ठेवण्यात आल्या असून गरज पडल्यास त्याचा लॉकडाऊनच्या काळात राज्यातील पोलिसांसोबत मदतीला वापर केला जाणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिली आहे. तसेच पोलिसांना देखील पांडे यांनी जर खरोखर काम असेल आणि कोणी बाहेर पडलं असेल तर हरकत नाही. जाणूनबुजून नियमभंग केला नसेल तर विनाकारण बळाचा वापर करू नका, असे सांगितले आहे. मात्र, जाणूनबुजून नियमांचा भंग करून आमच्यावर लाठी वापरण्याची वेळ आणून नका, असं देखील पांडे पुढे म्हणाले. तसेच नागरिकांना काही नियम जाणून घ्यावयाचे असल्यास ते स्थानिक पोलिसांना संपर्क साधून माहिती करून घेऊ शकतात. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर देखील आमची करडी नजर असणार असल्याचं पांडे यांनी सांगितले.
सध्याच्या घडीला राज्यातील पोलीस दलात ३ हजार १६० सक्रिय कोरोनाबाधित असून एकूण ३६ हजार ७२८ पोलिस कोरोनाबाधित झाले होते.