इटावा
देशात 'बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान'च्या गोष्टी बोलल्या जातात. आज जवळपास प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा पुढे निघून गेल्याचं आपण म्हणतो. किंबहुना महिलांनी आपल्या कर्तृत्वातून ते सिद्ध देखील करुन दाखवलं आहे. पण सामाजिक परंपरांच्या आडून आजही मुलींच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. याचंच एक ताजं उदाहरण उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये पाहायला मिळालं आहे.
भरथाना कस्ब्यातील कांशीराम कॉलनीमधील १३२ क्रमांकाच्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय प्रियांका कक्षा इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी होती. तिला यंदा १२ वीचं शिक्षण घ्यायचं होतं. पण त्याआधीच तिनं आपलं जीवन संपवलं आहे. प्रियांकाला तिच्या आयुष्यात आधी स्वत:ला काहीतरी सिद्ध करुन दाखवायचं होतं. इतर मुलींप्रमाणे तिलाही उच्च शिक्षण घ्यायचं होतं. पण वाढत्या वयाचं कारण देत घरच्यांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती.
प्रियांकाच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी वर शोधण्यास सुरुवात केली होती. तिच्यासाठी वर देखील निश्चित करण्यात आला आणि मुलीनं वडिलांना आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली. मला लग्न करायचं नाही, मला शिकायचं आहे असं प्रियांकानं वडिलांना सांगितलं. पण कुटुंबीयांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं सुरू केलं. आपल्या बोलण्याला अजिबात महत्व दिलं जात नसून कुटुंबीय आपलं लग्न केल्याशिवाय थांबणार नाहीत असं प्रियांकाच्या लक्षात येताच तिनं टोकाचं पाऊल उचलायचं ठरवलं. आपल्या राहत्या घरात तिनं गळफास घेत आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. ज्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळी प्रियांकाचे वडील प्रभू दयाल आणि त्यांची पत्नी काशीराम कॉलनीच्या १२३ व्या कॉर्टरच्या ग्राऊंड फ्लोअरवर होते. प्रियांकाला दोन लहान भाऊ आहेत आणि चार बहिणींमध्ये ती थोरली बहिण होती. वडील मोलमजुरी करुन घर चालवत आहेत.