सोलापूर : साधारण ५३ दिवसांपूर्वी माेहोळ तालुक्यात शिंगोली शिवारात ऊसाच्या फडात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला हाेता. प्राथमिक तपासात तिची हत्या झाल्याचे स्पष्ठ होताच कामती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास चालवला. मात्र अद्याप तिच्या खुनाला वाचा फूटत नसल्याने पोलीस अधिका-यांनी शुक्रवारी तिचे रेखाचित्र तयार करुन प्रसिद्ध केले.
कामती पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ३० जानेवारी रोजी शिंगोली शिवारात २५ ते ३० वर्षीय एका अनोळखी महिलेचा मृतदेह एका ऊसाच्या फडात आढळून आला. चेहरा विद्रूप आणि नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला. मात्र तिच्या जवळ ना कपडे, ना मोबाईल आढळून आला. मात्र डोक्यावर, छातीवर जखमा आढळल्यानंतर खुना प्रकार असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अंकूश माने यांनी तपास केला मात्र तिची ओळखच पटेना.
अखेर त्यांनी सुप्पर पोझीशन टेक्नीकच्या माध्यमातून तिचे रेखाचित्र तयार केले. सध्या हे रेखाचित्र त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, जिल्ह्याबाहेर, रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी ती चिटकवून तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे रेखाचित्र ओळखून तिची माहिती देण्या-या योग्य ते बक्षीसही देऊ असे अंकूश माने म्हणाले.