धुळे : गावठी कट्टा विक्री करण्यापूर्वीच शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील विजय पांडुरंग माळी (३०) याला साक्री रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी झाली असून, २० हजार रुपये किमतीचा कट्टा मॅगझिनसह जप्त करण्यात आला, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी एलसीबी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पथक उपस्थित होते. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील विजय पांडुरंग माळी हा ३० वर्षाचा तरुण साक्री रोडवरील डॉ. जे. के. ठाकरे चौकात आला आहे. त्याच्याकडे गावठी कट्टा असून तो विक्री करण्याच्या उद्देशाने थांबून आहे. अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने त्या चौकात जाऊन सापळा लावला. एका तरुणाची चौकशी केली असता त्याने उडवा - उडवीची उत्तरे देताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
तपासणी केली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला. त्याची २० हजार रुपये किंमत आहे. त्याला अटक करण्यात आली असून, शहर पोलीस ठाण्यात एलसीबी पोलीस कर्मचारी सागर शिर्के यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, कर्मचारी संजय पाटील, रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, संतोष हिरे, योगेश चव्हाण, राहुल सानप, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, सागर शिर्के यांनी कारवाई केली.