मुंबई : ॲपमधील रिफंड क्रेडिट करायचा असल्याचे सांगत एका निवृत्त बँक अधिकाऱ्याचे क्रेडिट कार्डवरून जवळपास सव्वा दोन लाख रुपयांची खरेदी करत फसवणूक करण्यात आली. मुख्य म्हणजे संबंधित बँक अधिकाऱ्याने ना डिटेल्स शेअर केले, ना कोणत्या लिंकवर क्लिक केले. या फसवणुकीची त्यांनी एमएचबी कॉलनी पोलिसांत तक्रार दिली असून तपास सुरू आहे.
प्रेमानंद शिरोडकर (वय ७०) बोरिवली पश्चिम परिसरात पत्नी ममता (७०) यांच्यासोबत राहतात. शिरोडकर हे रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड, फोर्ट येथून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा एक मुलगा परदेशात आयटी क्षेत्रात, तर दुसरा मुंबईतच आंतरराष्ट्रीय बँकेत काम करतो. शिरोडकर यांचे सारस्वत आणि पंजाब नॅशनल बँकमध्ये खाते असून ते स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरतात. ज्याचे पैसे ते ऑनलाइन भरतात. त्यांनी गाना ॲप इंस्टॉल करत वर्षभराचे पेड सबस्क्रिप्शन घेतले आहे.
नेमके काय घडले?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबरला सकाळी त्यांना दोन अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आले. तुम्ही गाना ॲप इन्स्टॉल केल्याने रिफंड प्राप्त झाले असून ते आम्हाला क्रेडिट करायचे आहेत. त्यासाठी क्रेडिट कार्डची माहिती द्या, असे सांगितले. मात्र, शिरोडकर यांनी माहिती दिली नाही. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर लिंक आली. मात्र, त्यांनी उघडली नाही. त्यानंतर त्यांचा फोन हँग झाल्याने त्यांनी रिस्टार्ट केला. मात्र, मोबाईलची बॅटरी संपल्याने त्यांनी चार्जिंगला लावला. फोन चालू केला त्यावेळी क्रेडिट कार्डद्वारे ॲमेझॉन पेवर जवळपास ११ विविध व्यवहारांत २ लाख ३६ हजार ११० रुपये काढण्यात आले. शिरोडकर यांनी कस्टमर केअरला संपर्क करत कार्ड ब्लॉक केले. त्यांनी एसबीआय कार्ड नोडल अधिकाऱ्यांनाही ई-मेल पाठविला.
बँकेकडून पैसे रिफंड मिळणार नाहीबँकेने शिरोडकर यांना २५ हजार रुपये अतिरिक्त क्रेडिट दिल्याचे सांगितले. तेव्हा मला न विचारता क्रेडिट लिमिट का वाढवले, असे विचारल्यावर मॅनेजरने त्यांच्यावर क्रेडिट कार्ड, सीव्हीव्ही आणि ओटीपी शेअर केल्याचा आरोप केला. फसवणूक झालेली रक्कम परत करता येणार नाही, असेही सांगितले.