लखनऊ : हैदराबादमध्ये झालेल्या डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर उत्तर प्रदेशच्या मंत्र्याने धक्कादायक वक्तव्य केले आहे. योगी सरकारचे राज्यमंत्री रणवेंद्र प्रताप सिंह ऊर्फ धुन्नी सिंह यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. तसेच गुन्हे कोणीही रोखू शकत नसल्याचे म्हटले आहे.
हैदराबादमध्ये गेल्या आठवड्यात ड्युटीवर जाणाऱ्या महिला डॉक्टरवर नराधमांनी सामुहिक बलात्कार केला होता. पोलिसांनी या आरोपींना 48 तासांत अटक केली असून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालविला जाणार आहे. यानंतर बिहारमध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. तर उत्तरप्रदेशच्या उन्नामध्येही युवतीवर बलात्कार करून तिला जाळण्यात आले होते.
देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संसदेत महिला खासदारांनीही संताप व्यक्त केला आहे. यावर नेते अभिनेत्यांच्या संतप्त प्रतिक्रियाही येत आहेत. मात्र, काही नेते, अभिनेत्यांनी वादग्रस्त विधानेही केली आहेत. धुन्नी सिंह यांना यावर विचारले असता त्यांनी म्हटले की, समाज आहे तर या समाजामध्ये 100 टक्के गुन्हे घडणारच नाहीत असे सांगणे चुकीचे ठरेल. भगवान रामांनीही अशी शाश्वती दिली असेल असे मला वाटत नाही. मात्र, जे गुन्हेगार आहेत त्यांना तुरुंगात धाडण्याची, शिक्षा करण्याची शाश्वती नक्की आहे.
कालच दक्षिणेतील निर्मात्याने वादग्रस्त पोस्ट केली होती. मुलींनी सोबत कंडोम घेऊन फिरावे आणि बलात्कार होताना विरोध न करता कंडोम देऊन जीव वाचवावा, अशी पोस्ट केली होती. तसेच सरकारनेही कायद्याने बलात्कार मान्य करावा, जेणेकरून भीतीने तो मुलीला मारणार नाही, अशी पोस्ट होती. मात्र, नंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करताच त्याने ती पोस्ट डिलीट करून टाकली आणि ही एका सिनेमासाठी स्क्रीप्ट होती असे म्हणत सारवासारव केली होती.