ठाणे: ठाणे महापालिका आयुक्त बंगल्याबाजूला हाकेच्या अंतरावर सोमवारी सायंकाळी कारवाईला गेलेल्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाचे लिपिक काशीनाथ राठोड यांच्या सुरा उगारणाऱ्या हरिभाऊ हुले या फेरीवाल्याविरोधात शुक्रवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हुले या फेरीवाल्याविरोधात सुरा उगारून धावणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे असे कलम लावण्यात आले असून अद्यापही कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पातलीपाडा येथील शरणम्चे, राज सोसायटीजवळ असलेल्या मोकळ्या पींची जागेत फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याची तक्रार आली होती. म्हणून काशिनाथ राठोड, दिलीप विखणकर, रवींद्र वाघमारे, प्रथमेश सनगरे हे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कारवाईला गेले होते. त्यावेळी खोबरे विक्रेता हुले हा फेरीवाला सुरा घेऊन राठोड यांच्या अंगावर धावून गेला. तसेच आधी एकाची बोटे तोडली आता तुझी मान उडवेन असे धमकावले. यावेळी इतर तिघा कर्मचाऱ्यांनी चपळाईने फेरीवाल्याला रोखले. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या घटनेमुळे काशिनाथ राठोड हा कर्मचारी प्रचंड घाबरला असून त्याचा रक्तदाब वाढला. शुक्रवारी राठोड यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात जाऊन झालेल्या प्रकारची तक्रार दिल्यावर त्या फेरीवाल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची पोलीसांनी दिली.
कारवाईप्रसंगी समूहाने राहण्याचा सल्लाठाणे महापलिका हद्दीत अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांवर कारवाईसाठी जाणाऱ्या पथकावर होणाऱ्या हल्ल्याची गांभीर्याने दाखल घेत, ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आणि अतिक्रमण उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ऑक्टोंबर रोजी गडकरी रंगायतन नाट्यगृहात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. यावेळी कारवाईला जातांना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी, कारवाई करताना तेथील परस्थितीचा आढावा घ्यावा, जास्त लोकांची गर्दी जमलेली असल्यास त्या ठिकाणाहून माघार घ्यावी, तसेच वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा कारवाई करावी तसेच कारवाईला जातांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समूहाने राहण्याचा सल्ला देखील दिला आहे.
फेरीवाल्यांना लवकर आयडी देणार ठाणे शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे देखील करण्यात आला होता. तर सहा हजार ३०० फेरीवाल्यांचे अर्ज आले आहेत. आता, या अर्जांच्या छाननी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच फेरीवाल्यांना ओळखपत्राचे वाटप केले जाणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
" सोमवारी झालेल्या हल्लाचा प्रयत्नाप्रकरणी शुक्रवारी तक्रार देण्यात आल्यावर त्या फेरीवाल्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कारवाईला जाताना पथकाने समूहाने राहावे, तसेच परस्थितीचा आढावा घ्यावा, जास्त लोकांची गर्दी जमलेली असल्यास त्या ठिकाणाहून माघार घ्यावी. असे सल्ला दिले आहेत. तर लवकर फेरीवाल्यांना ओळखपत्र वाटप केले जाणार आहे."-अश्विनी वाघमळे अतिक्रमण उपायुक्त, ठामपा