जळगाव : कर्जासंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या ३८ वर्षीय महिलेवर बँकेतच सुट्टीच्या दिवशी बलात्कार करणाऱ्या स्टेट बँकेच्या शिव कॉलनी शाखेतील व्यवस्थापक अशोक सिताराम शर्मा (रा. मुंबई) याला जिल्हा पेठ पोलिसांनी मंगळवारी अटक केली. न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेबर २०१७ मध्ये पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी ही महिला मैत्रीणीसह शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या शाखेत गेली होती. यानंतर १५ दिवसांनी महिलेस सुटीच्या दिवशी बँकेत बोलावले. बँकेत कोणीही नसल्याची संधी साधत शर्मा याने महिलेस गुंगीचे औषध टाकून शितपेय पिण्यास दिले. त्यांनतर त्याने बँकेतच त्यांच्यावर अत्याचार केला व त्याचवेळी आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ तयार केले. याच व्हीडीओद्वारे त्याने महिलेला ब्लॅकमेल करुन लग्नाचे आमीष दिले. त्यासाठी महिलेस घटस्फोट घेण्यास भाग पाडले. असे पीडितीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी शर्मा याला मंगळवारी न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी वकील रमाकांत सोनवणे यांनी युक्तीवाद केला.