डोंबिवली - येथील पूर्वेकडील गोळवली परिसरात एका ८४ वर्षीय वृध्द व्यक्तीने ८० वर्षीय वृध्द पत्नीची हत्या केल्याची घटना रविवारी घडली. पार्वती पाटील असे मृत पत्नीचे नाव असून आरोपीचे नाव बळीराम पाटील असे आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांचे ते आई-वडील आहेत. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न आरोपीकडून झाला. दरम्यान, ही हत्या घरगुती भांडणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून बळीराम यांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सकाळी आठच्या सुमारास हत्येची घटना उघडकीस आली. पार्वती या त्यांच्या रूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या अंगावरील कपडे जळालेल्या अवस्थेत होते. पती बळीराम हे मात्र त्यावेळी घरात नव्हते. बळीराम हे तापट स्वभावाचे असल्याने त्यांच्यात आणि पार्वती यांच्यात वारंवार वाद व्हायचा. शनिवारी मध्यरात्री अथवा रविवारी सकाळी काही कारणांवरून त्यांच्यात वाद झाला असावा आणि त्यांनी पार्वती यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बळीराम यांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कल्याण परिमंडळ ३चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गावी यायला नकार दिल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी डोंबिवलीत दुसरी हत्येची घटना घडली. पती आणि पत्नीमध्ये वाद होऊन काही वेळेला हा वाद विकोपाला जाऊन अशा प्रकारच्या घटना घडताना पाहतो. परंतु वृध्द व्यक्तींकडून हे कृत्य घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
धारदार हत्याराने वारया घटनेप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत पार्वती यांच्यावर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने नाकावर, डोळयावर, डोक्याच्या पाठीमागील बाजूस उजव्या कानावर वार करून त्यांना जीवे मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे शरीर व अंगावरील कपडे जाळण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले आहे. शनिवारी मध्यरात्री अडीच ते रविवारी सकाळी आठ च्या दरम्यान ही घटना घडल्याचेही नमूद केले . माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांनी फिर्याद दिली आहे.