मुंबई: गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिहारमधून बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या अटकेत आसलेल्या एजाजची मुलगी शिफा उर्फ सोनियाच्या चौकशीमधून एजाजची माहिती मिळवत गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अंडरवर्ल्डमध्ये एकच खळबळ उडाली आहे.एजाज लकडावालाविरोधात मुंबई शहरात खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न यासारखे 25 गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध 80 पेक्षा अधिक तक्रारी आहेत. लकडावाला हा आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून खंडणीसाठी फोन करून धमकावत होता. तो दाऊद टोळीचा खास हस्तक होता. पुढे एजाजने दाऊदशी फारकत घेत, राजेंद्र सदाशीव निकाळजे उर्फ छोटा राजनच्या मदतीने आपली टोळी तयार केली. राजनसोबत राहून मलेशिया, केनिया, कॅनडा, स्वित्झर्लंड आणि अरब देशांमध्ये त्याने आपले प्रस्थ निर्माण केले. 2002 साली बँकॉकमध्ये एजाजवर छोटा शकीलच्या हस्तकांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्याच्यावर एकूण 7 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. १९९२ ते २००८ पर्यंत एजाज छोटा राजन टोळीचा हस्तक म्हणून काम करत होता. टोळीमध्ये आर्थिक वाद झाल्यानंतर तो विभक्त झाला. त्यानंतर तो स्वतःची वेगळी टोळी चालवू लागला.गेल्या सहा महिन्यांपासून गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती. त्यात बनावट पासपोर्ट प्रकरणात एजाजची मुलगी शिफा शाहिद शेख उर्फ सोनियाला अटक करण्यात आली. तिच्या चौकशीत एजाज बिहार येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, बिहार पोलिसांच्या मदतीने 8 जानेवारी रोजी त्याला अटक करण्यात आली.
दाऊदपर्यंत पोहचणयाचा मार्गएजाजकडे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बरिचशी गोपनीय माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची कसून चौकशी सुरु असल्याचेही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.
खंडणीच्या गुन्ह्यात भाऊ अटकेतगेल्या वर्षी मार्च महिन्यात व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी एजाजचा भाऊ अकील लकडावाला याला अटक करण्यात आली होती.