मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणांपैकी एक असलेल्या ईडीकडून सध्या अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. बड्या राजकीय नेत्यांची संपत्तीची चौकशी करुन संबंधितांवर कारवाईही करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजय सिंह यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर, गुरुवारी ईडीने एका माजी आमदारावर कारवाई करत कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे. माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विवेकानंद पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे ४ वेळा आमदार राहिले आहेत. नवी मुंबईतील उरण मतदासंघातून ते आमदार बनले होते.
मुंबईच्या कर्नाला नागरी सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीने गुरुवारी विवेकानंद पाटील आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर कारवाई करत तब्बल १५२ कोटींची संपत्ती जप्त केली. ५४० कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणात आत्तापर्यंत ३८६ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, ईडीने १५ जून २०२१ रोजीच माजी आमदार विवेकानंद पाटील यांना अटक केली आहे. पाटील यांनी ६७ फेक बँक अकाऊंटच्या माध्यमातून कोट्यवधींची अफरातफरी केली होती. सन २००८ साली त्यांनी बँकेतील व्यवहारात भ्रष्टाचार व आर्थिक फसवणूक केल्याचे पोलिस तपासातून समोर आले होते.
मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईवरुन दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला होता. सन २०१९ साली रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ऑडिट करण्यात आल्यानंतर हे प्रकरण समोर आले. विवेकानंद पाटील यांनी ६३ फेक बँक अकाऊंटच्या माध्यमातून कर्ज काढून कर्नाला चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाला स्पोर्ट्स अॅकॅडमीला ही रक्कम दिली होती. या दोन्ही संस्थेची स्थापन आणि नियंत्रण पाटील यांच्याकडेच आहे.