मुंबई - प्रवासादरम्यान टॅक्सीत बॅग विसरलेले माजी आमदार सोहेल लोखंडवाला यांची बॅग २४ तासांत पायधुनी पोलिसांनी शोधून काढली. या बॅगेत सोहेल यांची अत्यंत महत्वाची कागदपत्रे होती. शेकडो सीसीटिव्ही तपासून पायधुनी पोलिसांनी ही बॅग शोधून काढली.
माजी आमदार सोहेल लोखंडवाला हे काही कामानिमित्त टॅक्सीतून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान घाईत असताना ते आपली बॅग टॅक्सीत विसरले. उतरल्यानंतर काही वेळाने टॅक्सीमध्ये बॅग विसरल्याचं सोहेल यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत तपासाला सुरूवात केली. लोखंडवाला यांनी प्रवास केलेली टॅक्सी ज्या मार्गावरून गेली त्या मार्गावरच्या सर्व सीसीटिव्हींची पडताळणी पोलिसांनी केली. एवढेच नव्हे तर टॅक्सीचा नंबर मिळवत आरटीओकडून टॅक्सी मालकाचा नाव, पत्ता मिळवला. त्यानंतर या टॅक्सीच्या इन्शुरन्सची माहिती घेऊन टॅक्सी मालकाचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्यानंतर ती टॅक्सी शोधून काढण्यात आली व हरवलेले कागदपत्र टॅक्सी चालक अनिल मोरया यांच्याकडून चेंबूर येथील वाशी नाका येथून ताब्यात घेण्यात आले. सर्व कागदपत्रे माजी आमदार सोहेल लोखंडवाला यांना परत करण्यात आली. सोहेल यांनी कारवाईत सहभागी झालेले पोलीस निरीक्षक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडारे व उपनिरीक्षक पवार व गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.