- मनीषा म्हात्रेमुंबई - राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि गुजरातमध्ये छापेमारी करुन तब्बल १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सर्वात घातक समजले जाणारे ६० किलो उच्च दर्जाचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ड्रग्ज रॅकेटमध्ये एअर इंडियाच्या माजी पायलटचाही समावेश होता. एनसीबीने माजी पायलट तसेच मुख्य सूत्रधारासह एकूण सहा जणांना अटक केली आहे.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या जामनगर येथील नेव्हल इंटेलिजेंस युनिटने काही लोकांच्या संशयास्पद हालचालींबद्दल माहिती दिली. त्यानंतर, एनसीबीने या यंत्रणेच्या समन्वयाने तपास सुरू केला. तपासात उच्च दर्जाच्या ड्रग्जची मोठ्या प्रमाणातील खेप गुजरातमधून इतर राज्यात नेली जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार, एनसीबीने ०३ ऑक्टोबरला आंतरराज्य ड्रग्ज तस्करीच्या सिंडिकेटचा पर्दाफाश करत १०.३५० किलो एमडी जप्त केले. आणि चार प्रमुख साथीदारांना बेड्या ठोकल्या. यात जामनगर येथून भास्कर व्ही. याला अटक करण्यात आली. तर अन्य आरोपींमध्ये माजी पायलट एस. जी. महिदा याच्यासह एस.एम. चौधरी आणि मुथू पी.डी. या तिघांना मुंबईतून अटक करण्यात आली.
आरोपींच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले. या चौघांचे ड्रग्ज तस्करीमध्ये मोठे संबंध असून त्यांचे साथीदार मुंबईत कार्यरत असल्याची माहिती समोर आली. एनसीबीच्या पथकाने आणखी एक आरोपी एम. एफ. चिस्टी याला अटक करत ०६ ऑक्टोबरला एसबी पथ, फोर्ट, मुंबई येथे असलेल्या एका गोडाऊनमधून सुमारे ५० किलो एमडी जप्त केले. पुढील तपासात एनसीबीने या टोळीचा मुख्य आरोपी एम. आय. अली याला अटक केली. दोन्ही आरोपी मुंबईचे असल्याची माहिती एनसीबीचे उपसंचालक एस. के. सिंग यांनी सांगितले.पायलटचा असा प्रताप ...एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केलेला सोहेल गफार महिदा याने एअर इंडियामध्ये २०१६ ते २०१८ या काळात पायलट म्हणून सेवा बजावली होती. त्याने सॅन अँटोनियो, टेक्सास, यूएसए आणि लिथुनिया येथून उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. जास्तीच्या पैशांसाठी तो या ड्रग्ज तस्करीत सहभागी झाला. त्याच्या कार्यकाळात त्याने काही ड्रग्जची ने आण केली का? याबाबतही पथक अधिक तपास करत आहे.मुथू हिस्ट्री शीटर... जामिनावर बाहेर येताच पुन्हा तस्करीमुथू नावाचा आरोपी हा ड्रग्ज तस्करीमधील हिस्ट्री शीटर आहे. त्याला डीआरआयने २००१ मध्ये ३५० किलो वजनाच्या मँड्राक्स तस्करीच्या प्रकरणात अटक केली होती. २००८ पासून तो जामिनावर बाहेर वावरत होता.
मुंबई पोलिसांच्या कारवाईतील आरोपींशी कनेक्शन ...जामनगर आणि मुंबईत जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा स्त्रोत एकच आहे. जप्त केलेले ६० किलो एमडी हे फक्त एका खेपेचा एक भाग आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी उध्वस्त केलेल्या हजारो कोटी किंमतीच्या एमडी ड्रग्ज रॅकेटशी त्याचा संबंध असल्याचेही समोर आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.