मुंबई :भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याच्या रागात राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावर मजकूर लिहिणाऱ्या मुंबईतील १५ वर्षीय मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जम्मू काश्मीर येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई व्ही. पी. रोड पोलिसांनी केली असून अधिक तपास सुरू आहे.
मुलीने कन्हैयालाल यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर तिचे विचार मांडले. हा मजकूर लिहिल्यापासून १ जुलैपासून तिला अनोळखी व्यक्तींकडून कॉल तसेच संदेश येण्यास सुरुवात झाली. तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. कन्हैयालाल यांचे समर्थन करण्याचा वाईट परिणाम होईल आणि तुझीही अवस्था तशीच केली जाईल, अशी धमकी तिला देण्यात आली. याची माहिती मुलीने वडिलांना देताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर व्ही. पी. रोड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. त्यासाठी आरोपीने तीन विविध मोबाईल क्रमांकांचा वापर केला होता. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. पी. रोड पोलिसांनी फयाज अहमद गुलाम मोहम्मद भट (३०) याला जम्मू काश्मीरच्या बडगाम येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.