नवी मुंबई : पुण्यातून उपचारासाठी वाशीला आणलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, तिला कोरोना चाचणीसाठी रुग्णालयाबाहेर नेले असता पुन्हा आल्यानंतर काही आक्षेपार्ह बाबी डॉक्टरांच्या निदर्शनास आल्या. यावरून तिच्यावर अतिप्रसंग झाल्याची शक्यता वर्तवली जात असून तिचा मृत्यदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.दरम्यान, खासगी रुग्णालयांमधील उपचार परवडणारे नसल्याने तिला पुणे येथून वाशीच्या पालिका रुग्णालयात आणण्यात आले होते. आई-वडील कोरोनाग्रस्त असतानाच त्यांच्या २८ वर्षीय मुलीचीही प्रकृती बिघडली होती. रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर मंगळवारी तिला कोरोना चाचणीसाठी सीबीडी येथे पाठवण्यात आले होते. यावेळी नातेवाईक तिच्यासोबत होते असेही समजते; परंतु रुग्णालयात परत घेऊन येत असताना तिची प्रकृती खालावलेली होती. यामुळे तपासणी करत असताना डॉक्टरांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. त्याबाबत वरिष्ठ डॉक्टरांना व पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र त्याचदरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. तिला कोरोना चाचणीनंतर रुग्णालयात घेऊन येत असताना आकडी आल्याचे चौकशीत समोर आले आहे. परंतु रुग्णालयात येण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार झाला आहे का, याचा उलगडा होऊ शकला नाही.
घटनेची कुटुंबीयांना माहिती नाही वाशीमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल तरुणीच्या कुटुंबीयांना काही माहीत नाही. सदर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल असे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश चव्हाण त्यांनी सांगितले.
सदर प्रकाराबद्दल अद्याप कोणाची तक्रार आलेली नसून केवळ आक्षेपार्ह गोष्टीवर संशय व्यक्त केला जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.