सातारा : गोवा राज्यातील दारूचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या बनावट विदेशी दारू निर्मितीवर उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून सांगली आणि सोलापुरातील दोघांना अटक केली. त्यांच्याकडून विदेशी दारूच्या १८८ बाटल्या, ३०० मोकळ्या बाटल्या, ७०० नग बुचे, तीन मोबाइल, दोन दुचाकी असा १ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे करण्यात आली.
अक्षय राजेंद्र जाधव (वय २७, सध्या रा. दुर्गळवाडी, पो. तारगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा, मूळ रा. मु. पो. ताकारी, ता. वाळवा, जि. सांगली), हर्षवर्धन भगवान कर्चे (वय २३, रा. पाचेगाव बुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तारगाव, ता. कोरेगाव येथे बनावट विदेशी दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती साताऱ्याच्या उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने सायंकाळी तेथे जाऊन छापा टाकला. यावेळी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी अक्षय जाधव आणि हर्षवर्धन कर्चे यांना अटक केली. हे दोघे गोवा राज्यातील दारूचा वापर करून बनावट विदेशी दारू तयार करत हाेते. त्यांच्याकडून विविध कंपनीच्या १८८ सीलबंद बाटल्या, ३०० मोकळ्या बाटल्या, ७०० नग बुचे, तीन मोबाइल, दोन दुचाकी असा १ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्कचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय साळवे, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, सहायक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, नितीन जाधव, जवान सचिन खाडे, अजित रसाळ, जीवन शिर्के, भीमराव माळी, उर्वेश पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला. याबाबत पुढील तपास दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर हे करीत आहेत.